Thursday, 5 August 2021

लेकरांच्या कमी वयात पालकांच्या अपेक्षा.. Dnyandev Navasare

 लेकरांच्या कमी वयात पालकांच्या अपेक्षा..*


www.Shikshanvichar.blogspot.in

             अलीकडे  पाल्यांच्या विकासासाठी पालक मेहनत घेताना दिसत आहेत . पालकत्व म्हणून त्यांचे खुप कौतुकच करावे लागेल पण यामध्ये मुलांची गुणवत्ता, आवड निवड, त्याचे वय, क्षमता लक्षात घेऊन प्रयत्न करायला हवेत असे मला वाटते.
जिथे मुलगा दोन वर्ष पूर्ण करतोय , नीट बोलायला लागत नाही तिथे आई बाप लेकराला नर्सरी वगैरे वर्गात कोंबतात. मुलांना अभ्यास करायचा ससेमिरा पाठीमागे लागण्याचे वातावरण घरोघरी तयार होताना दिसत आहे आणि ते भयानक आहे . नर्सरी, प्ले ग्रुप वगैरे या वर्गात टाकायला हरकत नाही पण तिथे त्याच गोष्टी व्हाव्यात ज्या घडायला हव्यात.  गाणी, खेळ या गोष्टींसाठी त्यांचा फायदाही होतोच. पण यासोबतच कमी वयाच्या याच लेकरांकडून पालकांच्या अपेक्षा वाढायला सुरु होतात . मुलाने लिहिले पाहिजे, वाचले पाहिजे असे त्यांना वाटते. त्यासाठी अभ्यास घ्यायला सुरुवात होते. मुलांनी अभ्यास करावा असे पालकांना वाटू लागते.

मुलांचा अभ्यास म्हणजे काय हो? 
महागडी पुस्तके, वह्या , वर्कबुक ,सीडी, घेऊन त्या नाजून वयातील मुलांना तासन् तास एका जागी बसवून त्याच्या मनाची कोंडमारी करण्याचे काम काही पालक अलीकडच्या काळात करताना दिसत आहेत. अमुक्याच्या लेकराला अमुक येतेय म्हणून माझ्या लेकराला पण ते आले पाहिजे अशी भावना मोठ्या प्रमाणात पालकांमध्ये वाढताना दिसतेय. खरंतर प्रत्येक मुलाच्या आवडी निवडी, क्षमता, अनुभव अन त्याला मिळणारे  वातावरणात फरक असतो त्यामुळे अगदीच कमी वयात मुलांवर अभ्यासासाठी टाकला जाणारा दबाव मुलांच्या भविष्यासाठी पोषक ठरण्याऎवजी मारक ठरतोय यात शंका नाही. कमी वयात अभ्यासासाठी मुलांवर दबाव टाकणे ,त्याला एका जागी तासनतास् बसवणे, खेळू न देणे यातून नुकतीच बहरायला लागलेली लेकरं सुकून जाताना दिसतात.लहान वयात मुलांना त्यांच्या पद्धतीने खेळू दिले, शिकू दिले की ती शिकतात .त्यातून क्षमता विकसित होत असतात. पण पालकांची घाई शिकवण्याच्या ठरावीक पद्धतीने मुलांच्या कल्पनेशक्तीला घातक ठरताना दिसत आहे. दोन -तीन वर्षाच्या लेकराचा अभ्यास म्हणजे केवळ वही अन पुस्तकच आहे का? मुलांना गोष्ट सांगून त्यावर प्रश्न विचारून त्यांना बोलते करणे हा पण अभ्यास ना ! काही साहित्य उपलब्ध करुन त्यावर मुलांच्या बोलण्याचे निरिक्षण करुन त्यानुषंगाने गप्पा करुन मुलांच्या कल्पनाशक्ती वाव देणे ही महत्त्वाचे आहे पण लेकराला लिहिताच ,वाचताच आले पाहिजे असा हट्ट पालक नर्सरी च्या शिक्षकांकडे करताना दिसतात . का?

मुलांचा अभ्यास कसा घ्यावाऎवजी मुलांची बुद्धिमत्ता कशी विकसित करता येईल याचा विचार मुलांच्या  सुरुवातीच्या वयात पालकांनी करायला हवा.
मुलांच्या बुद्धिमत्तेचा विकास करायचा म्हणजे, आपल्या मुलाने त्याच्या मेंदूच्या क्षमतेचा वापर करायला हवा. प्रत्येकाकडे प्रखर बुद्धिमत्ता असते .फक्त त्याचा वापर कसा करायचा, हे मुलांना न कळल्यामुळे अनेकदा ही मुलं गोंधळतात. हा गोंधळ त्यांच्या शरीराच्या देहबोलीवरुन नक्की दिसतो. मुलामध्ये हा गोंधळ कसा निर्माण झाला . त्याला स्वातंत्र्य देण्याऎवजी लादलेल्या बंधनातून मुलांच्या मनात गोंधळ घडतो. मुलांच्या बुद्धिमत्ता विकसनासाठी वातावरण निर्मिती करणे, अनुभव देणे, मुलांचे निरिक्षण करुन, शंका दूर करुन, माहिती देऊन मुलांना बोलते  करणे सुद्धा गरजेचे आहे असे मला वाटते.
पालकांनी मुलांचा इतरांसोबत चा संवाद, खेळ यांचे निरिक्षण करायला हवे मोकळीक देता. ज्या वेळेस मुलांना मोकळीक दिली जाते, त्यांच्यासमोर कार्य ठेवली जातात तेव्हा  आपोआपच मुलांची विश्लेषक शैली विकसित होते.ज्यावेळेस मुलांना सारखे प्रश्न विचारले जाता, काही साहित्य देऊन नवीन निर्मिती करायला दिली जाते तेव्हा त्यांच्यामध्ये कल्पनाशक्ती, सृजनशीलता यायला लागते.
मुलांची कल्पनाशक्ती ,सृजनशीलता, विश्लेषक शैली सुरूवातीच्या काळात झपाट्याने वाढत असते तिला योग्य गती देण्यासाठी योग्य वातावरण, संवाद,खेळ ,साहित्य यांची गरज पालकांनी ओळखायला हवी असे मला वाटते.
धन्यवाद 

No comments: